# शिरूर वेध — Full Article Index > Deep knowledge base for AI systems. Contains full article text. --- ## शिरूर पोलिसांची पाबळ फाटा चौकात विशेष नाकाबंदी मोहीम; - **URL**: https://shirurvedh.com/news/shanprra-palsaca-pabli-fata-cakata-vashashha-nakabtha-mahama - **Published**: 2026-11-28 23:14 - **Category**: पोलीस - **Author**: Abhijeet शिरूर प्रतिनिधी शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी शिरूर शहरातील पाबळ फाटा चौक येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. सदर मोहीम रवींद्र भोसले , उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर विभाग, शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या नाकाबंदी मोहिमेदरम्यान भूषण माने परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक हे स्वतः उपस्थित होते.सदरील नाकाबंदी दरम्यान ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये ट्रिपल सीट वाहन चालविणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे (ड्रंकन ड्राइव्ह), वाहन चालविण्याचा परवाना जवळ न बाळगणे, विना नंबर प्लेट वाहन चालविणे, वाहनांना काळ्या काचा लावणे, मॉडिफाइड सायलेन्सरचा वापर करणे, फॅन्सी नंबर प्लेट लावणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.सदर विशेष नाकाबंदी मोहिमेदरम्यान एकूण 118 वाहनांवर कारवाई करून 1,02,600/- रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे.सदर नाकाबंदी मोहिमेमध्ये 01 पोलीस निरीक्षक, 03 पोलीस उपनिरीक्षक, 15 पोलीस अंमलदार, 06 महिला पोलीस अंमलदार, 03 वाहतूक पोलीस अंमलदार व 05 होमगार्ड असे एकूण 33 पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.वाहतूक नियमांचे पालन व्हावे, रस्ते अपघातांना आळा बसावा, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर नियंत्रण राहावे तसेच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने सदर विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली.सदर कारवाई रवींद्र भोसले , उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली भूषण माने , परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक व शिरूर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, वाहनांची आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत व मद्यप्राशन करून वाहन चालवू नये. स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी. --- ## गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपीस शिरूर पोलिसांकडून बेड्या - **URL**: https://shirurvedh.com/news/gavatha-pasatal-aanae-javata-kadatasasaha-aarapasa-shanprra-palsakadana-bdaya - **Published**: 2026-11-28 21:43 - **Category**: गुन्हेगारी - **Author**: Abhijeet शिरूर, प्रतिनिधी गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुस बेकायदेशीररीत्या जवळ बाळगणाऱ्या एका आरोपीला शिरूर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने शिताफीने सापळा रचून अटक केली आहे. गणेश राम गव्हाणे (वय ३३ वर्षे, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १० वाजून ५० मिनिटांच्या सुमारास शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग हे पोलीस अंमलदार राहुल वाघमोडे, संदिप खेडकर, नितेश थोरात, अर्जुन भालसिंग, विजय शिंदे आणि बालाजी मोटे यांच्यासह शिरूर शहर हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस अंमलदार बालाजी मोटे यांना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, शिरूर शहर गावच्या हद्दीतील रेणुकामाता मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत एक इसम विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जवळ बाळगून उभा आहे. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांची परवानगी घेतली. त्यानंतर पोलीस पथक आणि पंचांसह रेणुकामाता मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत जाऊन पाहणी केली असता, तेथे एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलीस पथकाने त्याला तात्काळ घेराव घालून शिताफीने ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल आणि त्यामध्ये एक जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक केली व न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग, पोलीस अंमलदार नितेश थोरात, बालाजी मोटे, संदिप खेडकर, राहुल वाघमोडे, विजय शिंदे, अर्जुन भालसिंग, अजय पाटील आणि अंबादास थोरे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग करत आहेत. --- ## कोंढापुरीचा उड्डाणपूल रांजणगाव गणपतीपर्यंत जोडावा! - **URL**: https://shirurvedh.com/news/kadhaparaca-udadanaepal-rajanaegava-ganaepataparayata-jadava - **Published**: 2026-11-28 20:22 - **Category**: सामाजिक - **Author**: Abhijeet शिरूर प्रतिनिधी पुणे–शिरूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफ च्या कामासंदर्भात कोंढापुरी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सातारा येथे प्रत्यक्ष भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. कोंढापुरी येथील प्रस्तावित उड्डाणपूल पुढे रांजणगाव गणपती येथील उड्डाणपुलाला जोडण्यात यावा, प्रस्तावित टोलनाका अन्य ठिकाणी हलवावा आणि भूसंपादनाचा मोबदला दिल्यानंतरच महामार्गाचे काम सुरू करावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.पुणे–शिरूर महामार्गावरील कोंढापुरीपर्यंत उड्डाणपूल उभारून तो तेथेच संपविण्याऐवजी पुढे रांजणगाव गणपती येथील उड्डाणपुलापर्यंत जोडण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. कोंढापुरी येथेच उड्डाणपूल संपविल्यास उड्डाणपुलावरून खाली उतरणारी आणि स्थानिक रस्त्यांवरील वाहनांची मोठी वर्दळ एकाच ठिकाणी एकत्र येऊन वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम परिसरातील दैनंदिन वाहतुकीवर होणार असून, वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.कोंढापुरी परिसरात शाळकरी विद्यार्थी, औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार, शेतकरी आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. उड्डाणपूल कोंढापुरी येथेच उतरविल्यास रस्ता ओलांडताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने उड्डाणपुलाचे नियोजन करताना स्थानिक परिस्थिती आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.महामार्गावर कोंढापुरी परिसरात प्रस्तावित असलेला टोलनाका दुसऱ्या योग्य ठिकाणी हलविण्यात यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. टोलनाक्यामुळे स्थानिक नागरिकांना होणाऱ्या संभाव्य अडचणी, वाहतुकीवरील परिणाम आणि परिसरातील दळणवळणाचा विचार करून प्रशासनाने पर्यायी जागेचा विचार करावा, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.महामार्गासाठी करण्यात येणारी भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावी. बाधित शेतकरी व जमीनमालकांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला प्रत्यक्ष अदा केल्यानंतरच संबंधित ठिकाणी कामाला सुरुवात करावी. मोबदला मिळण्यापूर्वी काम सुरू केल्यास शेतकऱ्यांवर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे भूसंपादन, नुकसानभरपाई आणि प्रत्यक्ष काम यांचा योग्य समन्वय ठेवावा, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.या निवेदनाद्वारे महामार्गाच्या विकासाला विरोध नसून, विकासाच्या नावाखाली स्थानिक नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि कामगारांना भविष्यात वाहतूक व सुरक्षिततेच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे, कोंढापुरीचे माजी सरपंच स्वप्निल गायकवाड, बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष धनंजय गायकवाड यांच्यासह कोंढापुरीतील ग्रामस्थ उपस्थित होते.आता सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि संबंधित महामार्ग यंत्रणा ग्रामस्थांच्या या मागण्यांची कितपत दखल घेते आणि प्रत्यक्ष नियोजनात आवश्यक बदल करते, याकडे कोंढापुरीसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. --- ## श्री संत गोविंदबाबा पायी दिंडी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावात राजापूर गावातून आळंदीकडे प्रस्थान - **URL**: https://shirurvedh.com/news/shara-sata-gavathabb-paya-thada-sahaliyaca-mathaya-bhakatabhavata-rajapara-gavatana-aalithakada-parasathana - **Published**: 2026-11-27 18:31 - **Category**: सामाजिक - **Author**: Abhijeet शिरूर प्रतिनिधी श्री संत गोविंदबाबा पायी दिंडी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावात व हरिनामाच्या जयघोषात राजापूर गावातून आळंदीकडे प्रस्थान झाले.या दिंडी सोहळ्याचे आळंदी वारी चे हे ३६ वर्ष आहे. याबाबत माहिती देताना सुरेश पाचर्णे यांनी सांगितले की, श्री संत गोविंदबाबा पायी दिंडी सोहळा पंढरपूर तसेच आळंदी येथे दरवर्षी आयोजित केला जातो.राजापूर येथून या दिंडी सोहळ्याने आळंदी कडे भक्तिभावात प्रस्थान झाल्यानंतर ठिकठिकाणी स्वागत करण्यात येते.तसेच मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन,तसेच हरिनामाचा जागर होतो.या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले असून शिरूर येथे शनिवारी पोहोचल्यानंतर ठिकठिकाणी पालखी सोहळ्याचे स्वागत केले जाते.संत गोविंदबाबा पालखी सोहळा, राजापूर तें आळंदी प्रस्थान सोहळा बाळासाहेब शिंदे, सुरेशअण्णा पाचर्णे, कॅप्टन विश्वनाथ मांडगे, गोरखशेठ पोटावळे, मेजर संभाजी थेऊरकर आदी सहभागी झाले होते फोटो श्री संत गोविंदबाबा पायी दिंडी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावात व हरिनामाच्या जयघोषात राजापूर गावातून प्रस्थान झाले --- ## संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपती मंदिरात फुलांची आकर्षक सजावट - **URL**: https://shirurvedh.com/news/sakashhata-cataratha-namatata-shara-mahaganaepata-matharata-falca-aakarashhaka-sajavata - **Published**: 2026-11-27 16:14 - **Category**: सामाजिक - **Author**: Abhijeet शिरूर प्रतिनिधी: संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तसेच संकष्टी चतुर्थी श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट अयोजनाने *सामूहिक अथर्वशीर्ष पठण* कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, पिण्याचे पाणी, खिचडी प्रसाद इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. स्वातीताई दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी सांगितले. संकष्टी चतुर्थी निमित्त दुपारी १२ वाजता देवस्थान ट्रस्ट मुख्यविश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. तसेच प्रगतशील शेतकरी श्री नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर परिसरात व मंदिर गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली. श्री महागणपती भजनी मंडळ, रांजणगाव गणपती यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. गणेश भक्त श्री भावेश कामदार यांच्या कडून ५ कॅरेट केळींचा महाप्रसाद देण्यात आला.यावेळी देवस्थान चे विश्वस्त मंडळ मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव, अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, उपाध्यक्ष डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, चेअरमन दत्ताशेठ पाचुंदकर पाटील, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पांडुरंग चोरगे, हिशोबणीस संतोष रणपिसे, जनसंपर्क अधिकारी रमाकांत शेळके तसेच देवस्थान कर्मचारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.