शिरूर, प्रतिनिधी
गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुस बेकायदेशीररीत्या जवळ बाळगणाऱ्या एका आरोपीला शिरूर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने शिताफीने सापळा रचून अटक केली आहे.
गणेश राम गव्हाणे (वय ३३ वर्षे, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १० वाजून ५० मिनिटांच्या सुमारास शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग हे पोलीस अंमलदार राहुल वाघमोडे, संदिप खेडकर, नितेश थोरात, अर्जुन भालसिंग, विजय शिंदे आणि बालाजी मोटे यांच्यासह शिरूर शहर हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस अंमलदार बालाजी मोटे यांना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, शिरूर शहर गावच्या हद्दीतील रेणुकामाता मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत एक इसम विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जवळ बाळगून उभा आहे.
या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांची परवानगी घेतली. त्यानंतर पोलीस पथक आणि पंचांसह रेणुकामाता मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत जाऊन पाहणी केली असता, तेथे एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलीस पथकाने त्याला तात्काळ घेराव घालून शिताफीने ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल आणि त्यामध्ये एक जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक केली व न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग, पोलीस अंमलदार नितेश थोरात, बालाजी मोटे, संदिप खेडकर, राहुल वाघमोडे, विजय शिंदे, अर्जुन भालसिंग, अजय पाटील आणि अंबादास थोरे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग करत आहेत.
